माथेरान घाटातील अपघातांची मालिका कायम; जुम्मापट्टी येथे रेलिंग तोडून ट्रायल कार थेट नाल्यात

माथेरान घाटातील अपघातांची मालिका कायम; जुम्मापट्टी येथे रेलिंग तोडून ट्रायल कार थेट नाल्यात
कर्जत (गणेश पवार) : 
माथेरान घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून आज, शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा एक नवीन कार अपघात घडला आहे. जुम्मापट्टी स्थानकाजवळील गणेश मंदिराच्या पुढील वळणावर ट्रायल टेस्टिंगसाठी आलेल्या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली.
याआधी २५ ऑगस्ट रोजी विक्रोळी, मुंबई येथील पर्यटकांच्या स्विफ्ट कारला पिटकर पॉईंट येथे झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा घाटातील वळणावरील धोकादायक रस्त्यांमुळे हा नवीन अपघात झाला आहे. वेगाने आलेली कार लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकून नाल्यात अडकली.
या कारमध्ये तीन तरुण प्रवास करत होते. सुदैवाने कुणालाही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे माथेरान घाटातील रस्ता सुरक्षा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *