महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचणारे ३ अट्टल चोरटे अटकेत; ४ गुन्हे उघड, सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त

Chain scaching
पनवेल | संजय कदम 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पसार होणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा कक्ष ०३, पनवेल यांनी अटक केली आहे. मोटारसायकलवरून भरधाव वेगाने येत काही क्षणांत दागिने हिसकावून नेणाऱ्या या टोळीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. या गंभीर गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे व पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांनी दिले होते.
गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेलच्या पथकाने घटनास्थळांना भेट देऊन फिर्यादी व साक्षीदारांची माहिती घेतली, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. या तपासात पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मोहम्मद शफिक हनिफ शाह (२८), विवेक विश्वनाथ सोनार (२५) व आदर्श हरिसिंग दर्जी (२५) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून कौशल्यपूर्ण तपास करून सुमारे ९,९३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील २, कामोठे व खारघर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ असे एकूण ४ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्या सर्व गुन्ह्यांतील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. ही कामगिरी सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *