जेएनपीटी नोकरीच्या आमिषाने ३२ लाखांची फसवणूक; उरणचा तरुण वाशी पोलिसांच्या जाळ्यात

Fraud

रायगड | अमुलकुमार जैन
उरण तालुक्यातील रहिवासी ऋषभ राजेश म्हात्रे (२४) याने एका तरुणाला जेएनपीटीमध्ये एक्स्पोर्ट असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३२ लाख ८ हजार रुपये उकळून घेतल्याची फसवणूक प्रकरण उघडकीस आली आहे. वाशी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.
तक्रारदार मोहम्मद फहिम अब्दुल कलिम कुरेशी, जो सध्या एका खासगी कंपनीत सीनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे, याची ऋषभशी ओळख गेल्या वर्षी झाली होती. जानेवारी २०२४ मध्ये ऋषभने कुरेशी याला जेएनपीटीमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला ३० हजार रुपये घेऊन त्याने जेएनपीटीच्या नियुक्तीपत्रे, सॅलरी स्लिप, जॉब कन्फर्मेशन लेटर, परीक्षा क्लिअरन्स प्रमाणपत्र आणि पेनल्टी लेटर अशा बनावट कागदपत्रांची तयारी करून कुरेशीला पाठवली.
मार्च ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ऋषभने टप्प्याटप्याने कुरेशी यांच्याकडून तब्बल ३२ लाख ८ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. मात्र त्यानंतरही कुरेशीला कोणतीही नोकरी मिळाली नाही. संशय निर्माण झाल्यानंतर कुरेशीने कागदपत्रांची तपासणी केली असता ते सर्व बनावट असल्याचे उघड झाले. वाशी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने बनावट ई-मेल आयडी वापरून हे सर्व दस्तऐवज पाठवले. तसेच आर्थिक व्यवहारांचा आणि बनावट कागदपत्रांचा सखोल तपास सुरू आहे. ऋषभ म्हात्रे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.
या घटनेने स्थानिक भागात धक्कादायक प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. नोकरीच्या स्वप्नामुळे तरुणांनी भरभरून पैसे दिले, परंतु बनावट आश्वासनाने त्यांना फसवले जाण्याची ही घटना मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत असून इतर सहकार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातून युवकांना सतर्क राहण्याचे आणि नोकरीसंदर्भातील बनावट आश्वासनांकडे दुर्लक्ष न करण्याचे आव्हान वाशी पोलिसांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *