महाड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी–भाजप युतीचा जाहीरनामा जाहीर

Mahad jahirnama
महाड |
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात महाड महानगर परिषदेची निवडणूक होत असून, नागरिकांना अभिप्रेत असणारे शहराचे सुशोभीकरण, 24 तास मुबलक पाणीपुरवठा, कौशल्य विकास केंद्र यांसह विविध सुविधांची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या युतीने संयुक्त जाहीरनामा जाहीर केला. हा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, भाजपाचे माजी नगराध्यक्ष बिपिन महामुंणकर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कलमकर यांच्या उपस्थितीत महाडमध्ये पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला.
यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मागील पाच वर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेत, पुढील कालावधीत महाड शहराचे सर्वांगीण विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. विशेषतः महाड शहरातील घनकचरा व्यवस्थापन, तसेच ग्रामदैवत वीरेश्वर मंदिर परिसरातील रखडलेले सुशोभीकरण प्रकल्प जलद गतीने पूर्ण केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाड शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलस्रोत उभारले जाऊन शुद्ध पाण्याचा 24×7 पुरवठा सुनिश्चित केला जाईल. रोहा शहरात जसे नदी संवर्धन झाले, त्याच पद्धतीवर आधारित गॅबियन तंत्राचा वापर करून महाडमध्येही नदी संवर्धन केले जाईल. शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा विविध निधीतून उपलब्ध करून देण्याचे नियोजनही जाहीरनाम्यात समाविष्ट आहे. सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी बिपिन महामुंकर आणि स्नेहल जगताप यांच्याकडून झाल्याने त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्याची हमी तटकरे यांनी दिली.
महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली असून, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून हे केंद्र उभारले जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प शहरातील महिलांसाठी रोजगारक्षम संधी निर्माण करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील पाच वर्षांत महाड शहराच्या एकूण विकासाचा आराखडा साकारण्यासाठी हा जाहीरनामा नागरिकांसमोर अभिवचन म्हणून मांडत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *