रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपला व्यवसाय टप्पा 7000 कोटींपर्यंत नेऊन राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात आपली ओळख अधिक दृढ केली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत बँकेचा व्यवसाय तब्बल 1300 कोटींनी वाढला असून, यामागे बँकेच्या ठेवीत झालेली लक्षणीय वाढ हा मुख्य कारण ठरला आहे. या यशामुळे रायगड बँकेने राज्यातील महत्त्वाच्या सहकारी बँकांमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
बँकेने आपल्या सहामाही कामगिरीमध्ये क्यूआर कोड, IMPS आणि UPI आधारित सेवांवर विशेष भर दिला. यामुळे सेव्हिंग आणि करंट ठेवीत सातत्याने वाढ होत असून, ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांचा अनुभव सुधारला आहे. तसेच रायगडबाहेरील विश्वस्त संस्था, व्यापारी संघटना आणि सहकारी सोसायट्यांनीही बँकेच्या मुदत ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी सांगितले की, “ही प्रगती संपूर्ण रायगडच्या विश्वासाची कमाई आहे. ग्राहक आणि सभासदांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.” मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनीही माहिती दिली की, डिजिटल सेवा विस्तार आणि सायबर सुरक्षा मजबूत केल्यामुळे व्यवहारांची गती, सुरक्षितता आणि ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनी डिजिटल पद्धती स्वीकारल्यामुळे बँकेच्या ठेवीत आणि व्यवहारांमध्ये नैसर्गिक वाढ दिसून येत आहे.
याशिवाय, बँकेने एनपीए नियंत्रण आणि कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता यावरही प्राधान्य दिले आहे. संचालक मंडळाचा दैनंदिन कारभारातील सक्रिय सहभाग, निर्णयक्षम नेतृत्व आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळे बँकेची एक सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह प्रतिमा तयार झाली आहे.
मंदार वर्तक यांनी यासंदर्भात प्रतिपादन केले, “बँकेची वाढ ही फक्त आकड्यांपुरती मर्यादित नसून, ग्रामीण ग्राहकांच्या गरजांना प्रतिसाद देणाऱ्या आमच्या सेवा-तत्त्वज्ञानाची ही जमेची बाजू आहे. पुढील काळात तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि वित्तीय शिस्त या तीनही आघाड्यांवर बँक आणखी मजबूत काम करणार आहे.”
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा व्यवसाय टप्पा पार करणे राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे आणि या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.