रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना शिंदे गटाला या समीकरणाबाहेर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदासह १५ जागांवर तर भाजपा ५ जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
महाड नगर परिषदेत एकूण २० जागांसाठी निवडणूक होत असून शिवसेना शिंदे गट स्वतंत्ररित्या उमेदवार उभे करणार आहे. मागील काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात सुरू असलेला वाद आता प्रत्यक्ष राजकीय रणांगणात उतरणार आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होत असून रायगड जिल्ह्यातील पुढील निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उद्या महाडमध्ये उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी-भाजप आघाडी महाडसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून मागील कार्यकाळात दिलेल्या ८० टक्के आश्वासनांची पूर्तता झाल्याचा दावा माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी केला आहे. राहिलेल्या विकासकामांची पूर्तता आणि नव्या योजनांचा आराखडा या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.