तालुक्याच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर गेल्या वर्षीपासून घरपट्टी वाढीसंदर्भात नोटीसा बजावणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने यंदाही वाढीव अवाजवी घरपट्टी आकारणीसंदर्भात नोटीसा बजावल्याने यावेळी जनतेचा उद्रेक होण्यास सुरूवात झाली. याअनुषंगाने पोलादपूर बाजारपेठेतील श्रीगणेशमंदिरात तीन बैठका होऊन यासंदर्भात नागरिकांचे विचारमंथन झाले. 14 नोव्हेंबर 2025 रोजी घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केल्यानंतर याबाबतचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांना देण्यात आले. त्यानंतर लगेचच मुख्याधिकारी शिपाई यांनी गुरूवारी नगरपंचायत कार्यालयामध्ये सर्व संबंधितांना उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसमक्ष चर्चेचे निमंत्रण दिल्याने गुरूवारी नागरिक, नगरसेवक तसेच प्रशासन यांच्यातील चर्चेदरम्यान, नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवक अधिनियमांपुढे हतबल असल्याचे दिसून आले आणि मुख्याधिकारी शिपाई यांनी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा जनतेचा अधिकार कोणी हिरावून घेतला नसल्याचे स्पष्ट करून तोच एकमेव पर्याय असला तरी प्रशासन आणि नगरसेवकांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली. यामुळे पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचातर्फे आज, शुक्रवार, दि. घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
बुधवारी दुपारी दर्पण दरेकर, संतोष मोरे, प्रदीप भूतकर, गणेश शेठ, शैलेश पालकर, राजाभाऊ दिक्षित, सुनील भिलारे, गिरीधर दरेकर तसेच अन्य कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांची भेट देऊन निवेदन देत 14 नोव्हेंबरच्या जनआक्रोश मोर्चाबाबत रूपरेषा सांगितली. या निवेदनाच्या प्रती पोलादपूर तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यातही देण्यात आल्या. यानंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिपाई यांनी केवळ दोनच तासांमध्ये निवेदन देणाऱ्या नागरिकांना 13 नोव्हेंबरला चर्चेसाठी निर्धारित वेळ नमूद न करता पाचारण करण्याचे पत्र पाठविले. त्यानुसार, नागरिक समस्या निवारण मंचातर्फे बुधवारी सायंकाळी प्रभारी नगराध्यक्ष प्रसाद इंगवले आणि विरोधीपक्षनेते दिलीप भागवत यांच्याउपस्थितीत नागरिकांसोबत चर्चा होऊन या चर्चेत 13 नोव्हेंबरच्या बैठकीवेळी सर्व मुद्दे मान्य झाल्यास 14 रोजीचा नियोजित मोर्चा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक निवारण मंचातर्फे मोर्चावर ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आज, बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपंचायत कार्यालयामध्ये नागरिक समस्या निवारण मंचाचे सदस्य नागरिक, पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरसेविकांचे पती तसेच प्रभारी नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी विनय शिपाई आणि घरपट्टी मुल्यांकन मोजणीच्या ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिक समस्या निवारण मंचातर्फे प्रामुख्याने नगरपंचायत नगरपरिषद, औद्योगिक नगरी अधिनियमाच्या कलम 107 अन्वये नगरसेवकांचा तात्काळ वसुलीला स्थगिती ठराव केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि कलम 105 नुसार सदोष मुल्यांकन रद्द करण्यासंदर्भात आग्रह धरण्यात आला. मात्र, यावेळी मुख्याधिकारी शिपाई यांनी, मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून हे ठराव रद्द केले जाण्याचा पूर्वानुभव कथन केल्याने मुख्याधिकारी व नगरसेवक तसेच घरपट्टीवाढी संदर्भातील ठेकेदार कंपनी जनतेला उत्तरदायित्व निभावत नसल्याने शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पोलादपूर शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहापासून जनआक्रोश मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले.
अवाजवी घरपट्टीवाढीविरोधात पोलादपूरकरांनी सामूहिकपणे शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून पोलादपूर नगरपंचायत कार्यालयावर पोलादपूर शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहापासून जनआक्रोश मोर्चा काढण्यासाठी महिला भगिनी व पुरूष तरूण मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन नागरिक समस्या निवारण मंचातर्फे करण्यात आले आहे.