पेण तालुक्यातील हेटवणे वाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. केवळ चार वर्षांची चिमुकली किशोरी किरण महालकर ही बुधवारी (12 नोव्हेंबर) सकाळी आपल्या आईसोबत गावाबाहेर शौचालयाला गेली असता काही मिनिटांतच बेपत्ता झाली. आईने “बाळा आलोच मी” एवढं उत्तर दिल्यानंतर काही क्षणातच मुलगी गायब झाली. आईच्या आरडाओरडीनंतर गावकऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही.
गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. दरम्यान, गावकऱ्यांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले, मात्र मुलगी मात्र कुठेच सापडली नाही. या घटनेने गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. घातपात की अन्य काही? या प्रश्नावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनेची गंभीर दखल घेत पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी, क्यूआरटी, श्वानपथक आणि खोपोली बचाव पथकाला घटनास्थळी रवाना केले आहे. शोधमोहीम सुरू असली तरी 24 तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता लागलेला नाही. परिसरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.