महाड तालुक्यातील कोतुर्डे गावातील एका आदिवासी युवकाचा वाळसुरे नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.
प्राप्त महितीनुसार, अमर लक्ष्मण पवार (वय २२, रा. कोतुर्डे, ता. महाड) असे मृत युवकाचे नाव असून, तो पोहण्यासाठी नदीवर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ उलटूनही अमर घरी परतला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, किल्ले रायगडावर दर्शनासाठी आलेले काही शिवभक्त वाळसुरे नदीत आंघोळीसाठी गेले असता त्यांना नदीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली.
यानंतर कोतुर्डे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नदीतून अमर पवार याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.