एसटी स्थानकांबाहेरील अवैध प्रवासी वाहतुकीवर होणार धडक कारवाई; राज्यभर विशेष मोहीम सुरू!

मुंबई | प्रतिनिधी 
राज्यातील एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कठोर पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांद्वारे होणारी अनधिकृत प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत विशेष संयुक्त अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा परिणाम होत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. एसटी बसस्थानके परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे अथवा उतरविण्यावर बंदी राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच या अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या समस्या कमी करण्याचाही प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.
या मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. सर्व विभागांना संयुक्त पथके स्थापन करून नियमित तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आले असून कारवाईचा सविस्तर अहवाल मुख्यालयाकडे सादर करावा लागणार आहे. ही मोहीम केवळ औपचारिक न ठेवता जनहित आणि एसटीच्या हितसंरक्षणासाठी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे.