राज्याच्या विधानपरिषदेत बिनविरोध निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिकेत तटकरे यांनी आज मुंबईतील “वर्षा” या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनिकेत तटकरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्य करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात असून आगामी काळातील विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा, विकासकामे आणि लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा आपला निर्धार असल्याचे अनिकेत तटकरे यांनी सांगितले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. विकासाभिमुख, लोकहितकारी आणि सर्वसमावेशक कार्य करण्याचा संकल्प यानिमित्ताने अधिक दृढ झाला आहे,” असे अनिकेत तटकरे यांनी नमूद केले.
दरम्यान, अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यासह कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.