भाजपचा अर्ज अवैध; मुरूड पंचायत समितीवर सेनेचा भगवा – निलेश घाटवळ सभापती, अश्विनी जंगम उपसभापती

रायगड | अमुलकुमार जैन
मुरूड पंचायत समितीच्या सभापतीपदी निलेश शांताराम घाटवळ तर उपसभापतीपदी अश्विनी संजय जंगम यांची निवड जाहीर करण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार आदेश डफळ यांनी ही घोषणा केली. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)ने विजय मिळवत पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
मुरूड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान झाले होते, तर ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे तीन सदस्य तर भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य निवडून आला होता. त्यानंतर सभापती आणि उपसभापती पदांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली.
मुरूड पंचायत समिती कार्यालयातील महाराष्ट्र भूषण आमदार डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात सभापती आणि उपसभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट)कडून सभापती पदासाठी निलेश शांताराम घाटवळ तर उपसभापती पदासाठी अश्विनी संजय जंगम यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तर भारतीय जनता पक्षाकडून अश्विनी जयवंत डोगरीकर यांनी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केला होता.
पिठासीन अधिकारी आदेश डफळ यांनी सर्व उमेदवारी अर्जांचे वाचन करून छाननी केली. त्यावेळी भाजप उमेदवाराच्या अर्जावर सुचकांच्या जागी उमेदवाराने स्वतःच सही केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित दोन्ही अर्ज नियमबाह्य ठरवत पिठासीन अधिकाऱ्यांनी ते अवैध घोषित केले. परिणामी वैध अर्जांमध्ये केवळ शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार राहिल्याने निलेश घाटवळ यांची सभापतीपदी आणि अश्विनी जंगम यांची उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पंचायत समिती सदस्य गणेश प्रभाकर नाक्ती, उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, महिला जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, शहरप्रमुख संदीप पाटील, ऋषिकांत डोगरीकर, भगीरथ पाटील, बांधकाम संघटना अध्यक्ष दिनेश मिनमिने, युवा उपजिल्हाप्रमुख दिपेश वरणकर, वावडुंगी सरपंच ऋतुजा वरणकर तसेच जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी, ज्योती नागावकर, सी. एम. ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या निवडीमुळे मुरूड पंचायत समितीत शिवसेना (शिंदे गट)ची एकहाती सत्ता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक राजकारणात या घडामोडीची चर्चा रंगली आहे.