पेण नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या मंगळवार (दि. १०) रोजी झालेल्या निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली. पाच समित्यांपैकी चार समित्यांच्या सभापतीपदी महिलांची निवड झाल्याने नगरपालिकेच्या कारभारात ‘महिला राज’ पाहायला मिळत असून शहरात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी पेण नगरपालिकेत सत्ता स्थापन केली होती. मात्र निवडणुकीनंतर जवळपास दोन महिने उलटूनही विशेष समित्यांच्या निवडणुका न झाल्याने नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. अखेर मंगळवारी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष समित्यांच्या निवडणुका पार पडल्या.
या निवडणुकीत महिला व बालविकास समितीच्या सभापतीपदी कलावती पाटील, क्रीडा व शिक्षण समितीच्या सभापतीपदी आफ्रीन आखवारे, सार्वजनिक बांधकाम व नियोजन समितीच्या सभापतीपदी स्मिता माळी, तर कर व शुल्क समितीच्या सभापतीपदी सुनीता जोशी यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी आनंद जाधव यांची एकमताने निवड झाली.
या निवडीनंतर पेण नगरपालिकेच्या विशेष समित्यांमध्ये महिलांचे वर्चस्व निर्माण झाले असून शहरात ‘महिला राज’ पाहायला मिळत आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगरसेवक, शासकीय कर्मचारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
—————————————-
पेण शहरात महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या तसेच महिला बचत गटबाबत ज्या राज्यासह केंद्राच्या योजना आहेत त्या तळागाळातील महिला वर्गापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ दिला जाईल. त्याचप्रमाणे पालिका हद्दीतील बालकांचा अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासह इतर गोष्टी असतील त्यासाठी मी माझ्या पदाचा वापर करण्यासाठी कटिबद्ध असेन.
…कलावती पाटील, सभापती – पेण पालिका, महिला व बालकल्याण विभाग