पेण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज शांततापूर्ण वातावरणात पार पडली. सभापतीपदी स्मिता प्रमोद (पिंट्याशेट) पाटील तर उपसभापतीपदी संजय कमळाकर डंगर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी केली. त्यांना पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांचे सहकार्य लाभले.
पेण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक आज पेण येथील पंचायत समिती सभागृहात प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभापती पदासाठी स्मिता प्रमोद पाटील यांचा तर उपसभापती पदासाठी संजय कमळाकर डंगर यांचा असे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुकीची औपचारिकता शिल्लक राहिली होती.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या कालावधीत सभापती पदासाठी स्मिता प्रमोद पाटील यांच्या अर्जावर सूचक म्हणून संजय डंगर यांनी स्वाक्षरी केली होती. तर उपसभापती पदासाठी संजय डंगर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मेघा मंच्छीद्र पाटील यांनी स्वाक्षरी करून अर्ज दाखल करण्यात आला. इतर कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांनी दुपारी २ वाजता सभापतीपदी स्मिता पाटील आणि उपसभापतीपदी संजय डंगर यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर त्यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन करण्यासाठी खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, पेण नगराध्यक्ष प्रितम पाटील तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास गटनेते विवेक सदानंद म्हात्रे, प्रदीप मधुशेट म्हात्रे, सुशांत खाकर, मेघा मंच्छीद्र पाटील, कमळ पवार, अस्मीता प्रल्हाद पाटील तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संजय भोईर व प्रिती प्रशांत पाटील उपस्थित होते.
निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती स्मिता पाटील आणि उपसभापती संजय डंगर यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आपल्या दालनात जाऊन कार्यभार स्वीकारला.