फार्महाऊसमधील स्वच्छतागृहात हिडन कॅमेरा, धानसर येथील प्रकारानं महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Panvel dhansar farmhouse
रायगड | अमुलकुमार जैन
पनवेल तालुक्यातील धानसर गावातील एका खासगी फार्महाऊसमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात लपवलेला हिडन कॅमेरा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंब्रा येथील एक कुटुंब विश्रांतीसाठी या फार्महाऊसमध्ये आले असता, त्यांना बल्बच्या होल्डरमध्ये एक छोटा कॅमेरा लपवलेला आढळला. कॅमेऱ्यातील फूटेज तपासल्यावर महिलांच्या आंघोळीचे दृश्य रेकॉर्ड झाल्याचे स्पष्ट झाले. संतप्त कुटुंबीयांनी त्वरित तळोजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मनोज चौधरी (वय 35, रा. रांजनपाडा, खारघर) याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सागर निकम यांच्या तपासाखाली चौकशी सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. फार्महाऊस मूळ मालकाने भाडे तत्वावर आरोपीकडे दिले होते, आणि त्यानेच स्वच्छतागृहात गुप्त कॅमेरा बसविल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, नागरिकांना तसेच महिलांना सार्वजनिक ठिकाणी व रीसॉर्टमध्ये अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *