पोलिसांची मोठी कामगिरी ; 94 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

खारघर पोलिसांची मोठी कामगिरी
पनवेल | संजय कदम
 खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2025-26 या कालावधीत घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी आणि हरवलेल्या मोबाईल प्रकरणांचा तंत्रशुद्ध तपास करत पोलिसांनी तब्बल 94 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकांना परत केला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि झारखंड या राज्यांमध्ये पाठपुरावा करत पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
खारघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 176/2026 मध्ये खारघरमधील एका प्रतिष्ठित व्यक्तीवर चाकूने हल्ला करून 57 तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक करून सांगली जिल्ह्यातून 57 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच गुन्हा क्रमांक 175/2026 मध्ये एका महिलेच्या घराचे दार बनावट चावीने उघडून 27 लाख रुपयांची रोकड चोरी करण्यात आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली.
याशिवाय 2025 आणि 2026 मध्ये चोरीस गेलेले व हरवलेले 50 मोबाईल फोन तांत्रिक तपासाच्या मदतीने शोधून काढण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत 10 लाख 74 हजार रुपये इतकी आहे. सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस निरीक्षक अशोक डमाळे, सुरज पाटील, शितल पाटील तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली. मोबाईल शोध मोहिमेत पोलीस शिपाई मोतीराम आगिवले यांनी विशेष कामगिरी बजावली.