पोलादपूर पंचायत समिती शिक्षण विभागाविरोधातील उपोषणाची यशस्वी सांगता; चौकशी समितीची लेखी ग्वाही

Poladpur uposhan
पोलादपूर | शैलेश पालकर
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कथित गैरकारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी ६ जानेवारीपासून सुरू केलेल्या उपोषणाची अखेर यशस्वी सांगता झाली. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कवितके यांच्या हस्ते लेखी पत्र व लिंबू सरबत स्वीकारून ओंकार मोहिरे यांनी उपोषण मागे घेतले. पोलादपूर पंचायत समितीतील प्राथमिक शिक्षण विभागातील मनमानी कारभाराविरोधात सत्याग्रही मार्गाने लढा उभारल्याने प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली.
मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून ओंकार मोहिरे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हितासाठी व प्राथमिक शिक्षणातील अन्यायकारक धोरणांविरोधात सातत्याने पाठपुरावा केला होता. शिक्षण उपसंचालकांपर्यंत पोहोचलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने ६ जानेवारी २०२६ रोजी उपोषण सुरू करण्यात आले. दोन दिवस प्रशासनाकडून चालढकल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.
या चर्चेनंतर पोलादपूर पंचायत समिती शिक्षण विभाग व गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्या विरोधात त्रिसदस्य चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास योग्य कारवाई करण्याची लेखी ग्वाही शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले-कावडे यांच्या सहीने देण्यात आली. तसेच चौकशी काळात साळुंखे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कार्यभार काढून घेण्याची व मे २०२६ मध्ये बदलीची तोंडी हमी देण्यात आली. या आंदोलनात मनसे व मनविसेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले असून, गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या मनमानी कारभाराला चाप बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *