तालुक्यातील मतदारांना विधानसभा निवडणुकीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे प्रचंड राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, तालुक्यातील राजकीय पक्षांचा कल पाहता सद्यस्थितीत कोणतीही युती अथवा आघाडी होण्याची शक्यता अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर दिसेनाशी झाली असल्याने अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी युती-आघाडीचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा दिसून येत आहे.
गेल्या महिन्यापासून पोलादपूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे आणि शिवसेनाविरोधी गटबंधनाचे नेते एकत्रितपणे विचारमंथन करून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलेले नसल्याने अखेरिस सर्व राजकीय पक्षांनी निवडणुक स्वतंत्रपणे लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 16 व 17 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय पोलादपूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कपिल घोरपडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निवासी नायब तहसिलदार नथुराम सानप यांच्या कार्यालयामध्ये आतापर्यंत 16 जणांचे मागणी अर्ज दाखल झाले असून 46 नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाल्यानंतर यामध्ये काँग्रेसतर्फे दोन जिल्हा परिषद, भाजपतर्फे सहाही जागा, शिवसेनेतर्फे सहाही जागा, शेकापक्षातर्फे सहाही जागा, उबाठा सेना व मनसेतर्फे सहाही जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सहाही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष यांनीही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका सर्वसाधारण जागेवर उमेदवार देण्याची तयार केली असल्याची माहिती दिली. पहिल्या दोन दिवसांमध्ये 16 आणि 30 नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाल्यानंतर निवडणुक प्रशासनालाही किती पक्ष किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करतील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी नामनिर्देशनपत्राचे वितरण होऊनही दि.16 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरूवात होऊनही पोलादपूर तालुक्यात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. आज सोमवार, दि. 19 ते बुधवार, दि. 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने या काळात तब्बल 40 हून अधिक नामनिर्देशन पत्र दाखल होऊन दि.22 जानेवारी रोजी छाननीवेळी प्रथमच हरकती घेतल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत शिवसेना व भाजप किंवा काँग्रेस, उबाठा, मनसे, भाजप, शेकापक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अशी शिवसेना विरोधी आघाडी किंवा शिवसेना व शेकापक्ष विरोधात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा-मनसे, विरूध्द काँग्रेस अशी तिरंगी लढतही आगामी निवडणुकीवेळी पाहण्यास मिळणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची तडजोड न झाल्यास शेकापक्ष, भाजप, उबाठा मनसे, कॉग्रेस या छोटया पक्षांना नेहमीप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेहमीच्या लढतीमध्ये आपआपले राजकीय वजन राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेच्या पारडयात टाकून अलिप्त राहावे लागणार आहे.