तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील 6 उमेदवार आणि पंचायत समितीच्या 4 गणांतील 8 उमेदवारांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. यादरम्यान, पुर्वीच्या देवळे जि.प. 58 गटातील शेकाप काँग्रेसच्या सुमन कुंभार या जि.प.सदस्यांचे पुत्र डॉ.निलेश कुंभार यावेळी कापडे बुद्रुक जि.प. 58 गटातील शेकाप शिवसेना युतीचे उमेदवार आहेत तर त्यांना अजय सलागरे या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचे उमेदवारांचे तगडे आव्हान आहे. मात्र, पंचायत समितीच्या माटवण आणि कापडे बुद्रुक गणांतील उमेदवारांना मतदारांचा कौल आजमावता दमछाक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक 58 जिल्हा परिषद गटातील नामाप्र उमेदवार डॉ.निलेश कुंभार (शिवसेना), विरूध्द अजय सलागरे (राष्ट्रवादी-भाजपा) अशी थेट लढत होत आहे. या गटामध्ये यापूर्वी डॉ. निलेश कुंभार यांच्या मातोश्री सुमन काशिनाथ कुंभार या शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष आघाडीतून शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या होत्या. तर देवळे पं.स.गणातून काँग्रेसचे शैलेश सलागरे आणि गोवेले पं.स. गणातून शेकापक्षाच्या नंदा चांदे निवडून आल्या. त्यावेळी अजय सलागरे हे काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सरपंच व तालुकाध्यक्ष होते; यंदा अजय सलागरे हे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचे उमेदवार आहेत. मागीलवेळी शिवसेनेचे देवळे पं.स.गटातून पराभूत झालेले उमेदवार अनिल दळवी यावेळी मागील निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे शैलेश सलागरे यांच्यासोबतीने कापडे बुद्रुक 116 सर्वसाधारण गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल मालुसरे यांच्यासमोर आव्हानात्मक प्रचार करीत आहेत. शेकापक्षाने यावेळी पूर्वीच्या गोवेले आणि आताच्या माटवण 115 गणात नामाप्र महिला आरक्षणानुसार साक्षी कांबळेकर यांना उमेदवारी दिली आहे. शेकाप शिवसेना युतीविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने राकाँ शप पक्षातर्फे हर्षदा वरवाटकर यांना उमेदवारी दिली आहे.
तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या गटात अनेकदा राजकीय स्थित्यंतर घडून आले असले तरी मागीलवेळी काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या शेकापक्षाने यंदा शिवसेनेसोबत घरोबा केला आहे तर मागील वेळी शेकापक्षाची उमेदवारी करणाऱ्या सुमन कुंभार यांचा मुलगा डॉ.निलेश कुंभार यांनी शिवसेनेची उमेदवारी पत्करली असल्याने आणि शेकापक्षानेही या गटातील पूर्वीच्या गोवेले आणि आताच्या माटवण पं.स.गणात शिवसेनेसोबत युती केल्याने सकृतदर्शनी कापडे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासह माटवण पं.स.गणातही युतीला मताधिक्य दिसून येत आहे. या गटातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेला सर्वाधिक ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीमध्येदेखील या जिल्हा परिषद गटातील मतदान केंद्रांमध्ये मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यामाध्यमातून शिवसेनेलाच मताधिक्य दिसून आले आहे.
निवडणुकीचा प्रचारच मतदारांचा कौल बदलू शकेल, अशी परिस्थिती असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना मतदारांच्या दारोदार फिरून मतांची बेगमी करावी लागणार आहे.