राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली असून, या पदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव लवकरच मांडला जाऊ शकतो. अजित पवार यांच्या मतदारसंघातून त्या निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्याबाबत चर्चा सुरू असून, या सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होऊ शकते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनीही सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी उघडपणे मांडली आहे. अजित पवार समर्थकांनीही अंत्यसंस्कारानंतर बारामतीत हीच भावना व्यक्त केली असून, “सुनेत्रा अजित पवार” हे नाव उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांची जागा कोणीही भरू शकत नसली तरी आता पवार कुटुंबाने एकत्र येऊन नेतृत्वाबाबत निर्णय घ्यावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.