कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगररांगेतील प्रसिद्ध पेब (विकटगड) किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ठाण्यातील २५ वर्षीय तरुणाच्या पायावर महाकाय दगड कोसळल्याची घटना रविवारी घडली. नेरळ पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत धाडसी बचावकार्य करत पर्यटकाची सुखरूप सुटका केल्याने संभाव्य अनर्थ टळला.
कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगररांगेतील प्रसिद्ध पेब (विकटगड) किल्ल्यावर रविवारी ट्रेकिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. ठाणे येथील सात जणांचा ट्रेकिंग ग्रुप सकाळी पेब किल्ल्यावर ट्रेकसाठी आला होता. दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ट्रेकिंग करत असताना रोहन जीनोरस कदम (वय २५, रा. ठाणे) यांच्या पायावर अचानक महाकाय दगड कोसळला. दगडाचे वजन अधिक असल्याने त्यांचा पाय त्याखाली अडकून पडला आणि त्यांना हालचाल करणे अशक्य झाले.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी नेरळ पोलिसांशी संपर्क साधला. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई कणके व पोलीस हवालदार महाकाळ यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दुर्गम ठिकाणी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर पर्यटकाच्या पायावरील महाकाय दगड बाजूला करून रोहन कदम यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सुरक्षितपणे नेरळ येथे हलविण्यात आले.
पावसाळ्यात पेब किल्ला आणि माथेरान परिसरात ट्रेकर्सची मोठी गर्दी होत असते. मात्र, घसरडे दगड, सैल खडक आणि निसरड्या वाटांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे ट्रेकर्सनी आवश्यक सुरक्षा साहित्याचा वापर करावा, हवामानाचा अंदाज घेऊनच ट्रेकला जावे आणि अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकाचे प्राण वाचविणाऱ्या नेरळ पोलिसांच्या पथकासह मदतकर्त्या स्थानिक ग्रामस्थांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.