पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील नागझरी गावात असलेल्या ईलाईट हॉटेल अॅण्ड रिसॉर्ट येथे हॉटेल व्यावसायिकाला पिस्टलचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी १८ गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही थरारक घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या महिती नुसार, या प्रकरणी करण रमेश चावला (वय ४६, व्यवसाय – हॉटेल, रा. नागझरी, ता. अलिबाग) यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या रिसॉर्टमध्ये सध्या नवीन बंगल्यांचे बांधकाम सुरू असताना मयुरेश गंभीर (सराईत गुन्हेगार), मैथिली मयुरेश गंभीर (दोघे रा. पोयनाड) व लवेश (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) हे तिघे महिंद्रा कंपनीच्या कारमधून रिसॉर्टवर आले.
आरोपींनी फिर्यादीकडे विविध मागण्या करत दबाव टाकण्यास सुरुवात केली. आरोपी मैथिली गंभीर हिने सोन्याचे दागिने बनवून देण्याची मागणी केली, तर आरोपी लवेश याने रिसॉर्टच्या बांधकामाचा संपूर्ण ठेका आपल्यालाच देण्याचा आग्रह धरला. त्यानंतर मयुरेश गंभीर याने फिर्यादीला रिसॉर्टमधील एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद केला व पिस्टल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने पिस्टलचा ट्रिगर दाबला असता ते मिसफायर झाले, त्यामुळे फिर्यादीचा जीव थोडक्यात वाचला.
यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकावत त्यांच्या खिशातील ५० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१/२०२६ नुसार भादंवि कलम ३८५, ३८६, ५०६, ३४ तसेच आर्म अॅक्ट कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी मयुरेश गंभीर याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये पेण, पोयनाड, पनवेल शहर, अलिबाग, उरण, विक्रोळी, मांडवा सागरी आदी पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणूक, शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी मैथिली मयुरेश गंभीर हिच्यावरही पोयनाड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जमाव, शस्त्र कायदा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास पोयनाड पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.