पनवेल महानगरपालिका (PMC) सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. प्रारूप मतदार यादीत तब्बल १२,१४३ दुबार आणि संशयित मतदारांची नावे आढळल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे. या संशयित नावांपैकी मोठा हिस्सा नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील असल्याचे समोर आले असून, स्थानिक निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घरत यांनी पनवेल मनपाच्या आयुक्त व प्राधिकृत अधिकारी (मतदार यादी) यांच्याकडे तातडीने निवेदन दिले असून, बेलापूर (विधानसभा १५१) येथून ६,१३८ तर ऐरोली (विधानसभा १९०) येथून ६,००५ अशी संशयित नावे पनवेल मनपा यादीत आढळल्याचे नमूद केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फक्त स्थानिक मतदार असणे बंधनकारक असतानाही, जिल्ह्याबाहेरील मतदारांची घुसखोरी मोठ्या अनियमिततेकडे निर्देश करते.
यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही दुबार नावे आढळूनसुद्धा कारवाई न झाल्याची आठवण करून देत, या ‘बोगस’ मतदारांच्या आधारावर निवडणुकीचे निकाल वळवले जाऊ शकतात, अशी भीती घरत यांनी व्यक्त केली. त्यामुळे १२,१४३ दुबार मतदारांची तातडीने चौकशी करून अंतिम यादीत त्यांच्यासमोर चिन्हांकन करावे आणि मतदाराचे मतदान फक्त एका केंद्रातच होईल याची खात्री करण्याचे नियोजन करावे, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा संपूर्ण निवडणुकीची विश्वासार्हता संकटात येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.