तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नरवीर तानाजी विद्यालय देवळे येथे करण्यात आले असता मुदतपुर्ण झालेल्या माजी जि.प. व पं.स. सदस्यांची राजकीय भाषणे शाळकरी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी ठरली.
यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, पोलादपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शैलेश सलागरे, शाळा समिती अध्यक्ष ज्ञानदेव केसरकर, माजी सरपंच व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम केसरकर, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुरेश साबळे, मारुती कळंबे, विजय पवार, ज्ञानोबा रेणोसे ,विक्रम केसरकर, शिवाजी केसरकर, आनंद केसरकर, विनायक केसरकर, धर्मेंद्र रिंगे मुख्याध्यापक राकेश पिंगळा, किसन सुरवसे, नवाज तांबोळी, टी डी जाधव, सुनील शिंदे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर आदींसह बहुसंख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बाल वैज्ञानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळेतून सुमारे 40 प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या. देवळे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक सुखलाल बागुल यांनी तयार केलेली प्रतिकृती चांद्रयान ३ ही प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली.
दुर्गम पोलादपूर तालुक्यात रोजगार संधी उपलब्ध नसल्याने स्थलांतरामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील 100 ते 125 प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शासनाच्या धोरणानुसार अतिरिक्त झाले असल्याची चिंता उद्घाटनपर भाषणात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त करत विज्ञान प्रदर्शनातून एखादा विद्यार्थी मिसाईल मॅन अब्दुल एपीजे अब्दुल कलाम निर्माण होऊ शकतात अशी गुणवत्ता असल्याने व्यवसाय निर्मिती द्वारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत व रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन कळंबे यांनी दिले.
पोलादपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शैलेश सलागरे यांनी, भविष्यात शाळा बंद झाल्यास पोलादपूरकरांचे भवितव्य काय ? असा प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी पर्यटन, उद्योग, व्यवसाय निर्मितीसाठी भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून कळंबे यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी महाडचे माजी पं.स. सभापती तथा रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संजय चिखले यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणीव व जागृती होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे आहे असे सांगितले.
नतावि देवळे शाळा समितीचे सभापती ज्ञानदेव केसरकर यांनी स्थलांतर रोखण्यासाठी तालुक्यात मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज होणे गरजेचे असल्याचे सांगून शाळेचा 14 वर्षे 100 टक्के निकाल असल्याची माहिती शाळा दिली. याप्रसंगी गणित विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष सुरेश साबळे यांनी प्रास्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना विशद केली.