नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने स्पाच्या आड सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर कारवाई करत पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने २४ सप्टेंबर रोजी सीबीडी परिसरातील ‘अथेन्स स्पा’ येथे छापा टाकून ही कारवाई केली. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खात्री केली आणि त्यानंतर स्पावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान स्पामध्ये पाच महिलांना कथित वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या पाचही पीडित महिलांची सुटका केली.
या प्रकरणी स्पा मॅनेजर संदिपा सुखलाल राडी (२४) हिला अटक करण्यात आली आहे. तर महेश मोहनन नायर (३६), सुहास नंदकुमार जाधव (३७) आणि वैभव रामचंद्र भास्कर (४२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच PITA Act अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम आणि त्यांच्या पथकाने केली.