बोरघाटात कंटेनर-टेम्पो ५० फूट दरीत; चालकाचा जागीच मृत्यू, टेम्पो चालक जखमी, बचाव पथकांची शर्थीची कामगिरी

रायगड | अमुलकुमार जैन
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. २८) सकाळी कंटेनरने पुढे जाणाऱ्या टाटा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गालगतच्या सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पो चालक जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कंटेनर चालक मोहम्मद कैफ (२४) हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत आल्यानंतर कंटेनरवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी कंटेनरने पुढे जाणाऱ्या टाटा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की, दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली.
अपघातानंतर कंटेनरच्या केबिनमध्ये मोहम्मद कैफ अडकला होता. गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पो चालक मीराज शेख (२९) हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलची रुग्णवाहिका आणि एफकॉन कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकांनी तातडीने दरीत उतरून वाहनांमध्ये अडकलेल्या टेम्पो चालकाला बाहेर काढले. त्याला पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दरीत कोसळलेली वाहने बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले. अपघातामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनास्थळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
या अपघातामुळे बोरघाटातील धोकादायक वळणे आणि खोल दऱ्यांच्या परिसरात वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा गरज झाली आहे.