दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २९ नोव्हेंबरला उलवेत ‘भूमिपुत्र स्वराज्य संकल्प सोहळा २०२६’; शरद पवार, उदय सामंत, जयंत पाटील यांची उपस्थिती

पनवेल | प्रतिनिधी 
लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी, २९ नोव्हेंबर रोजी उलवे येथील स्व. दि. बा. पाटील भूमिपुत्र भवन येथे ‘भूमिपुत्र स्वराज्य संकल्प सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या सोहळ्यात भूमिपुत्रांचे हक्क, रोजगार, उद्योग-व्यवसायाच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबन या महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन होणार आहे.
दि. बा. पाटील यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने अतुल म्हात्रे ग्लोबल लर्निंग अँड रिसर्च सेंटरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि परिसरातील औद्योगिक विकासामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा स्थानिक युवकांना लाभ मिळावा, तसेच वाहतूक, गोदाम व्यवस्था, लॉजिस्टिक्स, हॉटेल आणि सेवा क्षेत्रात रोजगार व उद्योगांच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यावर या सोहळ्यात चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमाला पद्मविभूषण शरदचंद्र पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, कामगार नेते भाई जगताप आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती यावर विचारविनिमय केला जाणार आहे. भूमिपुत्रांनी विकासाचे केवळ लाभार्थी न राहता विकासाचे भागीदार व्हावे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे निमंत्रक अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, युवक, महिला आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.