रायगड जिल्ह्यातील कोलाड ते तळवली दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्व्हिस रोडचा पत्ता नाही, पादचारी पुलाचे कोणतेही नियोजन नाही, आणि आता पुन्हा भर पावसात ग्रामस्थांना विश्वासात न घेता खोदकाम सुरू करण्यात आले आहे. परिणामी ग्रामस्थांना तारेवर चालण्यासारखी कसरत करत रोजच्या आयुष्यात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा महामार्ग ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. कित्येक ठेकेदार आले आणि गेले, सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी दौरे करून आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कामाचा दर्जा आणि गती दोन्हींचा बोजवारा उडालेला आहे.
विशेषतः कोलाड ते तळवली भागात ठेकेदारांकडून गावकऱ्यांच्या सूचना आणि अडचणी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात येत आहेत. यापूर्वी मंत्र्यांनी गावातील नागरिकांना दिलेली आश्वासने पोकळ ठरली असून ठेकेदारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अलीकडेच भर पावसात खोदाई सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे काही ठिकाणी अंडरपास पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून नागरिकांना वाहतूक व चालणंही अशक्य झाले आहे.
या महामार्गाच्या बांधकामामध्ये सर्व्हिस रोड, गटारे, पादचारी पूल आदी मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने दिल्या गेल्या नाहीत. ठेकेदारांचे बेजबाबदार आणि निकृष्ट दर्जाचे काम हे येथील लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया व आंदोलनांना कारणीभूत ठरत आहे.
——————————————–
गेली अनेक वर्ष या मार्गाचे काम सुरू आहे अनेक ठेकेदार या कामात आले गेले मात्र येथील ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरले आहेत दिवसेंदिवस येथील ग्रामस्थांची होणारी हेळसांड याला जबाबदार शासन अधिकारी आणि ठेकेदार आहे बांधण्यात आलेल्या पादचारी पुळामुळे गावाला जोडला गेलेला डांबर रस्त्याचे व गटार लाईनचे अर्धवट अवस्थेत काम असल्याने अनेकांना मार्ग क्रमण करता येत नाही तसेच बांधण्यात आलेल्या पुलाखालून काही वाहने देखील जात नाहीत गेली अनेक वर्षे या समस्येला सामोरे जावे लागत आहे.मागील ठेकेदाराने या ठिकाणी मोठ मोठे ब्रेकर घेऊन खोदाई केल्याने घरांना तडे गेले त्याची आजतागायत नुकसान भरपाई नाही अनेकदा न्यायासाठी सदरील खात्याशी हेलपाटे घातले आमदार खासदार मंत्री यांना देखील निवेदन दिली राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील येथून पाहणी करून गेले त्यांनी देखील पाहणी करून घरांची पाहणी केल्यानंतर पुन्हा काम सुरू करतांना घर मालक आणि ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाईल असे आदेश उपस्थित तातकालीन अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले होते मात्र त्याची कोणतीच अंमलबजावणी न करता आज घडीला ठेकेदार हुकूमत गाजवत सोबतील पोलिस फौज घेत काम सुरू करून आम्हा ग्रामस्थांवर अन्याय करत असल्याचे घर मालक तथा ग्रामस्थ प्रफुल घावटे यांनी सांगितले.