पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे परिसरात सिडको अंतर्गत सुरू असलेल्या जलबोगद्याच्या कामामुळे नदी प्रदूषित झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पेण तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे, बळिराम पाटील आणि रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून पंचक्रोशीतील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे, मुंगोशी, दवणसर आणि वळक परिसरातील गावांमध्ये सिडको अंतर्गत मेघा इंजिनिअरिंग कंपनीकडून सुमारे ३०० फूट खोल जलबोगद्याचे काम सुरू आहे. या खोदकामादरम्यान गंधक, सल्फर व इतर क्षारयुक्त रासायनिक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नदीचे पाणी प्रदूषित झाले असून शेती, भाजीपाला, मासेमारी तसेच पशुधनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय या खोदकामामुळे अनेक गावांतील आणि आदिवासी वाड्यांतील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक झरेही बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात बळवली ग्रामपंचायतीने पेण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नदीत सोडले जाणारे दूषित पाणी तात्काळ बंद करावे किंवा शुद्धीकरण करून मोठ्या पाईपलाईनद्वारे खाडीत सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून हेटवणे धरणातून जाणाऱ्या सिडको पाईपलाईनमधून संबंधित गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणात हरीष बेकावडे, रमेश पाटील, बळिराम पाटील, अमित म्हात्रे, चंद्रकांत पाटील, मदन पाटील, माई पाटील, वनिता पाटील यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.