रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष मधुकर मारुती पाटील यांना कुंटे बाग येथील जिल्हा परिषद दालनात औपचारिकरित्या विराजमान करण्यात आले. या वेळी स्वागत सोहळा उत्साहात पार पडला असला तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या पदभार स्वीकृतीनिमित्त जिल्हा परिषदेत स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात शिंदे गटाची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. रायगड जिल्हा परिषदेत अलीकडेच झालेल्या निवडीत अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
मात्र अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या स्वागत सोहळ्यात शिंदे गटाच्या नेत्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. काही राजकीय जाणकारांनी ही अनुपस्थिती केवळ योगायोग असू शकते असे मत व्यक्त केले, तर काहींनी यामागे स्थानिक पातळीवरील नाराजी किंवा अंतर्गत राजकीय समीकरणे कारणीभूत असू शकतात, अशी शक्यता वर्तवली. एकीकडे महायुतीची सत्ता स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेत महायुतीतील समन्वय कसा राहणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.