दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारीच्या निषेधार्थ पोलादपूर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. पोलादपूर तहसील कार्यालयात जाऊन या मोर्चेकऱ्यांनी निवेदन सादर केले.
दिल्लीच्या जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला असून, या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे.
आंदोलनावर केलेला लाठीमार कारवाई हा लोकशाहीवरील आघात असल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथे ‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर तसेच संभाजी ब्रिगेड पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चादरम्यान सहभागी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पोलादपूरचे नायब तहसीलदार नथूराम सानप यांनी ‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संस्थेचे हरिश्चंद्र पवार, अध्यक्ष अरुण मोहिते व अन्य संघटना प्रमुखांच्या उपस्थितीत मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले.