गुटखा तस्कर मुद्देमालासह वडखळ पोलिसांच्या ताब्यात

गुटखा तस्कर मुद्देमालासह वडखळ पोलिसांच्या ताब्यात
अलिबाग | अमुलकुमार जैन
महाराष्ट्र शासनाने घातलेल्या गुटखा बंदीच्या आदेशाला धाब्यावर बसवत बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वडखळ येथील एका व्यक्तीवर वडखळ पोलिसांनी कारवाई करत रंगेहाथ पकडलं. ही कारवाई वडखळ गावातील सर्व्हिस रोडवर दत्त साई एंटरप्रायजेस दुकानासमोर करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फरहाद नसरुद्दीन अंसारी (वय ३६, रा. वडखळ, ता. पेण, जि. रायगड, मूळगाव धनपुरा, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून निळ्या रंगाच्या पिशवीत लपवलेला तसेच घरात असलेला बेकायदेशीर गुटखा साठा जप्त केला. यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला आणि V-1 तंबाखू यांचा समावेश असून, साठ्याची किंमत हजारोच्या घरात असून फरहाद नसरुद्दीन अंसारी याच्या ताब्यात असणारी MH-06-CF-1984 ही काळ्या रंगाची होंडा अ‍ॅक्टिवा (सुमारे ₹४५,००० किमतीची) देखील जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार रुपेश शंकर कोंडे (वय ४१) यांनी तक्रार दाखल केली असून, गुन्हा क्र. 124/2025 नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 123 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि साठवणुकीवर बंदी असतानाही, आरोपीने आरोग्यास घातक पदार्थांची वाहतूक करून स्वतःच्या फायद्यासाठी कायद्याचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस स्टेशन टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, फौजदार भाग्यवान कांबळे, महेश ठाकूर, पोलीस हवालदार प्रशांत देसाई, पोलीस हवालदार रुपेश कोंडे या पथकाने कारवाई केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *