काम होण्यासाठी लाच देण्याची वेळ आल्यास तक्रार देण्याचीही मानसिकता असावी – रायगड पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले

पोलादपूर | शैलेश पालकर 
लाच देणे व घेणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे, कुठलेही सरकारी काम लाच न देता झाले पाहिजे हा नागरिकांचा अधिकार आहे. काम होण्यासाठी लाच देण्याची वेळ आल्यास तक्रार देण्याचीही
मानसिकता असावी, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात विशेष जनजागृती अभियानावेळी केले.
रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष अभियान सोमवार दि. 26 डिसेंबर पासून सुरू केले आहे. याअंतर्गत पोलादपूर शहरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जुन्या तक्रारदारांसह परिसरातील ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, समाजसेवक, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिकांच्या भेटी घेऊन अँटी करप्शन कायद्याबाबतीत जनजागृती करण्यासंदर्भात रायगडच्या पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे, सहायक फौजदार अरुण करकरे तसेच महाड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काळे, पोलादपूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे, ज्येष्ठ समाजसेविका कांचन बुटाला आदींसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महाड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये लांच देण्याऐवजी लाच मागणाऱ्या विरोधात तक्रार देण्याची भूमिका निर्माण केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग त्यांचे कामदेखील पुर्ण करण्यासाठी सहकार्य करेल, याबद्दल खात्री करुन द्यावी म्हणजे काम होणार म्हणून तक्रारदार प्रोत्साहित होईल, अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री नंबरवर तक्रार दिल्यानंतर थेट आपल्यासोबत संपर्क साधला जाणार असल्याने कारवाई होणार याबद्दल निश्चिंत राहावे, असेही उपअधीक्षक सरिता भोसले यांनी यावेळी आश्वासित केले.
प्रारंभी पोलीस निरीक्षक नारायण सरोदे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांनी जेन झी यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंश प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याने भावी पिढी देशाप्रती सतर्क असल्याचे दिसून आले, असे सांगून जगातील सर्वात जास्त महागड्या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या जर्मनी देशात शैक्षणिक कालावधीचा संपूर्ण खर्च आणि आपल्या देशातील एका वर्षाचा खर्च सारखाच असल्याचे उदाहरण दिले. त्या देशाच्या प्रगतीत भ्रष्टाचारमुक्त समाजाचा हातभार असावा लागतो, असे मत व्यक्त केले.
यावेळी शासकीय कार्यालयांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री नंबरसह अन्य नंबर असलेला फलक लावण्यात आला तर नागरिकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्याविरोधात नागरिक उत्स्फूर्तपणे तक्रार देतील, असे मत सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक मुजावर यांनी व्यक्त केले. या सूचनेचे स्वागत उपअधीक्षक सरिता भोसले यांनी करीत पोलादपूर तहसील कार्यालयाबाहेर जनतेचे लक्ष वेधून घेईल असा फलक लावण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक उतेकर, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मुराद वारोसे, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक मुजावर, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. शेवटी महाड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काळे यांनी या जनजागृती अभियानाच्या आयोजनाबद्दल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.