कशेडी भुयारी मार्गाजवळ खेड बाजूला पुन्हा दरडी कोसळल्या

कशेडी भुयारी मार्गाजवळ खेड बाजूला पुन्हा दरडी कोसळल्या

पोलादपूर (शैलेश पालकर)  :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गावर पुन्हा दरडी कोसळल्याच्या घटना झाली. या दरडींमुळे रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दृश्य काही काळ दिसून आले.
दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारापासून 200 मीटर अंतर आधी दरडी कोसळल्या. रविवार दि.15 जूनरोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दरडी कोसळल्यानंतर तब्बल दोन तास एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली.
गेल्या महिन्यातदेखील याच ठिकाणी दरडी कोसळून वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. दरड कोसळल्यानंतर सुमारे दीड तासांच्या अंतराने एसडीपीएल शिंदे डेव्हलपर्स कंपनीकडून दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू झाले.
या घटनेची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार शंकर कुंभार, मिसाळ, केदार, कुलकर्णी, रामाकडे, चिकणे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत सुरू ठेवले आहे.
दरम्यान कशेडी घाटात वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिंदे डेव्हलपर्स कंपनी यांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रात्रंदिवस कशेडी भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूने दक्षता घेऊन रेस्क्यू टिम सज्ज ठेवण्याची गरज असल्याचे मत वाहनचालक आणि प्रवासी जनतेकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *