येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मॉसाहेब रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तसेच अन्य शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आले.
सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या माहेरच्या वंशजांतील सध्याचे वारस श्रीभगवंतराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखालील ही रथयात्रा राज्यभरात सुरू असून सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्मस्थळापासून पाचाड येथील समाधीस्थळापर्यंत ही रथयात्रा दरवर्षी सुरू राहात असून रथयात्रा पोलादपूर येथे आली असता माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, उद्योजक रामदास कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगरपंचायतीचे सभापती सिध्देश शेठ, शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश शिंदे व शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे दिलीप साबळे, शंकरबुवा तुर्डे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मामुळे सुसंस्कृत छत्रपाती शिवाजी महाराज घडले आणि छत्रपती शिवरायांमुळेच आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना व हिंदुत्वाचा गजर मोठया आवाजात करू शकतो. यामुळेच प्रत्येक घराघरात राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजेत तर छत्रपती शिवरायांचा प्रत्ययही घराघरांमध्ये जाणवेल, असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या 351 व्या पुण्यतिथीनिमित्त या सिंदखेडराजा येथील रथयात्रेस पुढे मार्गस्थ होण्यासाठी उपस्थितांनी घोषणा देऊन निरोप दिला.