रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारा प्लास्टिक कचरा आणि दोनशे मीटर परिसरात पसरलेल्या ऑइल मिश्रित चिकट द्रावामुळे संपूर्णतः प्रदूषित झाला आहे. या परिस्थितीमुळे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
गेल्या तीन पिढ्यांपासून ग्रामस्थ या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन करीत असले तरी यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण पहिल्यांदाच आढळले. कचऱ्यातून वाट काढत ग्रामस्थांनी कसेबसे दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन किनारा स्वच्छ करण्याचा संकल्प केला तसेच प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सहकार्य करावे अशी मागणी केली.
गावकऱ्यांनी व्यक्त केलेली मोठी चिंता म्हणजे पर्यटनावर होणारा विपरीत परिणाम. आंजर्ले हे गेल्या पाच वर्षांत पर्यटन नकाशावर झळकू लागले आहे. किनारा प्रदूषित राहिल्यास पर्यटकांची संख्या घटेल आणि पर्यटन व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसेल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
याशिवाय किनाऱ्याच्या अस्वच्छतेमुळे निसर्ग व जलप्रदूषण वाढेल, ज्याचा परिणाम पुढील जनजीवनावर होऊ शकतो. पर्यावरणाचा समतोल धोक्यात येईल. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने स्वच्छता मोहिम राबवण्याची मागणी केली आहे.