अल्पवयीन प्रेमसंबंधामुळे बालविवाहाचा घाट, पतीसह दोन्ही कुटुंबावर पोस्को तसेच बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Baal Vivah
महाड ( मिलिंद माने ) : अल्पवयीन प्रेमी जोडप्याच्या प्रेमसंबंधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने बेकायदेशीर लग्न लावण्याचा घाट दोन्ही कुटुंबाने केल्यामुळे पतीसह मुलीचे आई-वडील सासू-सासरे यांच्याविरोधात बालविवाह तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना महाड तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाड तालुक्यातील वाकी येथील अल्पवयीन मुलीचे आणि मुमुर्शी आदिवासीवाडी येथील अल्पवयीन मुलाचे एक वर्षाहून अधिक काळापासून प्रेमसंबंध होते त्यातून सदर मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली.
या घटनेमुळे दोन्हीकडच्या कुटुंबांनी या दोघांचे बेकायदेशीररित्या लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला परंतु महाडच्या महिला समुपदेशन केंद्रातर्फे हा प्रकार हाणून पाडण्यात आला आणि याबाबत महाड तालुका पोलीस स्टेशन येथे बुधवार ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलीचे वडील ,मुलीची आई, सासरे,सासू आणि अल्पवयीन पती या पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा २००६ च्या कलम १०,११ त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोस्को अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२,१७ आणि भादवि कलम ३७६(२)(i)(n) ,३४ या कलमांखाली कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण घटनेचा तपास महाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर पी माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून सदर घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्या कारणाने या संपूर्ण गुन्ह्याचा तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *