अलिबाग नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षाचे एकूण ३ सदस्य निवडून आले असून, त्यामध्ये शिवसेना (उ.बा.ठा.) चे २ आणि भारतीय जनता पक्षाचा १ सदस्य आहे. या तिन्ही सदस्यांनी एकत्र येत श्री. संदीप जनार्दन पालकर यांची अधिकृतपणे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली आहे. मात्र, नगरपरिषदेत विरोधी पक्षाला स्वतंत्र दालन मिळणार की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
दरम्यान, नगरसेविका अॅड. श्वेता संदीप पालकर यांनी मुख्याधिकारी कार्यालयाकडे लेखी पत्र सादर करत विरोधी पक्षासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नगरपालिका कायदा, १९४९ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष किंवा गट अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवू शकतो. यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के जागांची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.
संदीप पालकर यांच्या नेत्यापदाची घोषणा झाल्यानंतर नगरपरिषदेतील राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्षाला दालनासह संसदीय सुविधा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेते, यावर विरोधी पक्षाचे अधिकार आणि भविष्यातील भूमिका निश्चित होणार आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.