उरण तालुक्यात लहान मुलं व मुली पळविण्याच्या घटना वाढत असल्याच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एनसीआरबीच्या प्रकाशित आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०२१ ते २०२४ या कालावधीत लहान मुलं पळविणे व बेपत्ता होण्याचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराज्य टोळ्या मुलांना पळवून त्यांना कामाला लावणे किंवा भीक मागायला लावण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
उरणमधील बोरी परिसरात लहान मुलं पळविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून, स्थानिक नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत हा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेनंतर उरण पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली आहे. बोरी किंवा उरणच्या इतर भागात प्रत्यक्षात कोणतीही टोळी सक्रिय आहे का, याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानीफ मुलाणी यांनी दिली असून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, उरणमधील विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुलं चोरीच्या संदेशांचे व्हायरल होणे ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अनोळखी व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित उरण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.