RCF कडून रायगडच्या तरुणांना नोकरी परीक्षेचे मार्गदर्शन!

अलिबाग | अमुलकुमार जैन
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळ युनिटच्या वतीने रायगड जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. आरसीएफमधील विविध शाखांतील प्रबंधन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप समजावे आणि परीक्षेची योग्य तयारी करता यावी, यासाठी १८ नोव्हेंबर रोजी विशेष ‘भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. 
हा कार्यक्रम १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अलिबाग येथील आरसीएफ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील समृद्धी सभागृहात होणार आहे. या उपक्रमाचा लाभ रायगड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गासह अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांना घेता येणार आहे.
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये प्रबंधन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र, ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेची पद्धत आणि परीक्षेची तयारी याबाबत उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आरसीएफ थळ युनिटने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या मार्गदर्शन सत्रात आरसीएफमधील संबंधित विषयांचे तज्ज्ञ अधिकारी उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांमधील तज्ज्ञांकडून परीक्षेची तयारी, प्रश्न सोडविण्याच्या पद्धती आणि आवश्यक बाबींचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांना त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी ई-मेलची प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी तसेच आधारकार्ड (प्राधान्याने), पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची छायाप्रत सोबत आणावी. ई-मेलमध्ये नमूद केलेल्या वेळेनुसार संबंधित ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन/प्रशासन) प्रशांत पाटील यांनी केले आहे. स्थानिक तरुणांना केवळ नोकरीची संधी न देता त्या संधीसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने आरसीएफचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.