बोर्लीतील १६० मीटर रस्ता पुनर्बांधणीतून वगळला! ग्रामस्थांमध्ये नाराजी

अलिबाग | अमुलकुमार जैन
रस्त्याच्या विकासकामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असताना बोर्ली गावातील सुमारे १६० मीटर लांबीचा जुना आणि खराब झालेला रस्ता पुनर्बांधणीच्या कामातून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चेनज २८४/९९५ ते २८५/१५५ या दरम्यानचा हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अखेर या प्रश्नावर ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (MSIDC) च्या कोकण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी निवेदन देत रस्त्याची नव्याने पुनर्बांधणी करण्याची मागणी बोर्ली सरपंच सपना जायपाटील यांनी निवेदनद्वारे केली आहे.
बोर्ली गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाचे काम मे. Tarmat-Varaha JV या कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. मात्र, या कामादरम्यान चेनज २८४/९९५ ते २८५/१५५ या सुमारे १६० मीटरच्या जुन्या PQC रस्त्याचा भाग पुनर्बांधणीच्या कामातून वगळण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे.
सदर रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले असून काँक्रीटही उखडले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याचे बहुतांश काम नवीन होत असताना केवळ १६० मीटरचा भाग जुन्याच अवस्थेत राहणार असेल, तर संपूर्ण रस्त्याच्या विकासाचा उपयोग काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या १६० मीटर रस्त्याची तांत्रिक तपासणी करावी आणि नव्याने PQC काँक्रीटीकरण करण्यासाठी कंत्राटदाराला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीची छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.
रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या वगळलेल्या भागाची दखल घेऊन पुनर्बांधणी झाली नाही, तर भविष्यात ग्रामस्थांना पुन्हा खराब रस्त्याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे MSIDC प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे बोर्ली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.