PEN : ५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कांदळे येथील तलाठ्यावर अॅन्टी करप्शन ब्युरो ची धडक कारवाई

रायगडमध्ये लाचलुचपत प्रकरणात दोन खासगी महिला रंगेहात अटक
पेण तालुक्यातील मौजे कांदळे येथील सर्व्हे नं. ८९ या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची नावे नोंद करण्यासाठी ५,००० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरोपी लोकसेवक महादेव सिताराम धुमाळ (वय ३४) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टी करप्शन ब्युरो) कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
तक्रारदार यांनी दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी लाप्रवि, अलिबाग, जिल्हा रायगड येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवकाने स्वतःसाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अॅन्टी करप्शन ब्युरोने नमूद केले आहे.
पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी करताना दिनांक २२/१२/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०६ ते ०६.२३ या वेळेत मोबाईल फोनद्वारे, तसेच ०७.०३ ते ०७.४२ या वेळेत उपविभागीय अधिकारी, पेण कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष भेटीत ५,००० रुपयांची लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे पंचनामा व पुराव्यांद्वारे निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणाची कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप अधीक्षक सरिता आय. एस. भोसले (अॅन्टी करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग) आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव, पोह महेश पाटील, परम ठाकुर, सुमित पाटील तसेच चापोह सागर पाटील यांचा समावेश होता.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा.
संपर्कासाठी:
  • संकेतस्थळ: acbmaharashtra.net
  • ई-मेल: acbmaharashtra@mahapolice.gov.in, acbthane@mahapolice.gov.in
  • टोल फ्री क्रमांक: 1064
  • दूरध्वनी: 022-20813598 / 20813599
  • अॅन्टी करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग कार्यालय: 02141-222331
  • व्हॉट्सअॅप: 8087821064
भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार अॅन्टी करप्शन ब्युरोने व्यक्त केला असून नागरिकांनी निर्भयपणे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले यांनी केले आहे.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *