नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत गावात एका लहान मुलावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेने परिसर हादरून गेला आहे. ६ जानेवारी रोजी दुपारी घोडे शोधण्याच्या बहाण्याने आरोपी जमीर तांबोळी याने मुलाला दुचाकीवर बसवून शेलु परिसरातील जंगलात नेले. तेथे आरोपीने मोबाईलवर व्हिडिओ तयार करत मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
दरम्यान, पीडित मुलाने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तात्काळ नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी त्वरित तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत आरोपी जमीर तांबोळी याला रात्री अकराच्या सुमारास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात पोस्को अधिनियम २०१२ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता २०२३ मधील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे गावात व परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस प्रशासनाने आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने पुन्हा एकदा बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजानेही अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.