Karjat : पोशीर पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा! जलजीवन मिशन फेल, ग्रामस्थांचे हाल

Karjat poshir water suplay
कर्जत (गणेश पवार) : 

कर्जत तालुक्यातील पोशीर पाणीपुरवठा योजना अपयशी ठरली असून जलजीवन मिशनचे बारा वाजले आहेत. गावागावात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. मात्र पोशीर गावात सव्वा करोड रुपये खर्च करूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

2023 ते 2025 या कालावधीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. शासनाने पोशीर ग्रामपंचायतीच्या पोशीर चिकन पाडा पाणीपुरवठा योजनेकरीता सुमारे सव्वा करोड रपये खर्च केले आहेत. याच कालावधीत पोशीर चिकनपाडा पाणीपुरवठा योजनेतून होत असलेला पाणीपुरवठा अत्यंत दूषित असल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या एका योजनेतून वॉटर फिल्टरेशन सिस्टीम बसवण्यात आली. मात्र वॉटर फिल्ट्रेशन सिस्टीम दोन वर्ष पूर्ण झाली तरी आजतागायत कार्यान्वित झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांचे शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याचे स्वप्न आजवर अपूर्णच राहिले आहे. शुद्ध पाणी तर दूरच परंतु जे पाणी मिळते ते पिण्यालायक नसल्याने इतर घरगुती वापर करण्यासाठी पाणी मिळत आहे . हे पाणी चार ते पाच दिवसातून एकदाच मिळत आहे.
पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने पोशीर व चिकणपाडा येथील 70% ग्रामस्थ हे पिण्याच्या पाण्यासाठी खासगी बोअरवेलवर पाणी भरत आहेत अथवा कमर्शियल वॉटर सर्विसमधील विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. पोशीर गावाकरीता उल्हास नदीवरील पाणी योजना 2015 पासून कार्यान्वित झाली 2015 ते 2022 या कालावधीत ही योजना पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली चालवली जात होती. ही योजना पोशीर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा समितीने वारंवार विनंती करूनही आपल्या ताब्यात घेण्यास साडेसात वर्षे इतका विलंब का लावला हा संशोधनाचा विषय आहे.
2023 पासून जलमिशन योजनेअंतर्गत कार्यान्वित झालेली नवीन पाणीपुरवठा योजनादेखील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास अससमर्थ ठरत आहे. या योजना प्रगतीपथावर असताना ग्रामस्थानी यावर हरकत घेतली होती त्यावेळी या योजनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत माहिती व ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सभा बोलावण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती पण तसेही घडले नाही परिणामी ही योजना दोषपूर्ण अवस्थेत कार्यान्वित आहे .त्यामुळे ग्रामस्थांना महिन्यातून केवळ 6 ते 7 वेळा पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकाचा व नियोजनाचा अभाव, उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या, विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारिणीचे दुर्लक्ष्य , पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे अशा अनेक कारणामुळे ही योजना भोवऱ्यात आहे.
पोशीर पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक समस्या दूर करण्यात व पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पोशीर ग्रामपंचायत वारंवार अपयशी ठरत आहे. शासनाकडून इतका भरमसाठ निधी खर्च करून कार्यान्वित केलेल्या दोन योजना असतानादेखील ग्रामस्थांना पाण्यासाठी चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. पोशीर ग्रामपंचायतीच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *