JSW कंपनीच्या आरएमएचएस कन्व्हेअर प्रकल्पातील लाखोंचा लोखंडी माल चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
धरमतर ब्रिजलगत सुरू असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या आरएमएचएस कन्व्हेअर प्रकल्पासाठी साठवून ठेवलेला तब्बल २ लाख १७ हजार ११० रुपयांचा लोखंडी माल अज्ञातरीत्या लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 
प्राप्त महितीनुसार,  धरमतर ब्रिज परिसरात सुरू असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या आरएमएचएस कन्व्हेअर प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेले सी-टाईप लोखंडी पोल, सेंटरिंग सपोर्ट पोल, स्प्लाईस प्लेट आणि टीएमटी सळ्या असा एकूण २,१७,११० रुपयांचा माल रविवार (दि. १२ जुलै २०२६) रोजी सकाळी ६ वाजण्यापूर्वी अज्ञातरीत्या चोरीला गेला. याप्रकरणी महेश माथर्डन विटील गोपालन (वय ४५) यांनी वडखळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुकेश भदई सहानी (वय २०) आणि ब्रिजेश राधेश्याम सहानी (वय २०), दोघेही सध्या एच.पी. पेट्रोलपंपासमोर, धरमतर ब्रिजपुढे, शहाबाज (ता. अलिबाग) येथे वास्तव्यास असलेल्या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीस गेलेल्या मालामध्ये १९ सी-टाईप लोखंडी पोल, १३ सेंटरिंग सपोर्ट पोल, ११ स्प्लाईस प्लेट तसेच विविध आकारांच्या ३२२ टीएमटी सळ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा अधिक तपास वडखळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रूपेश कोंडे करीत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून, लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.