Alibag : कुर्डुस ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण वादाच्या भोवऱ्यात; तिरंगा उलटा फडकविल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कुर्डुस ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण वादाच्या भोवऱ्यात; तिरंगा उलटा फडकविल्याचा ग्रामस्थांचा आरोप
रायगड | अमुलकुमार जैन
देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना कुर्डुस ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ध्वजारोहणावेळी राष्ट्रीय तिरंगा उलटा फडकविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
कुर्डुस ग्रामपंचायत कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नागरिक असे सुमारे १५० जण उपस्थित होते. सकाळी आठच्या सुमारास ध्वजारोहण सुरू असताना राष्ट्रीय ध्वजाची दिशा चुकीची असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले.
ग्रामविकास अधिकारी मिलिंद सावंत यांनी ध्वज उलटा फडकविल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीत केला आहे. उपस्थित नागरिकांनी तत्काळ आक्षेप घेतल्यानंतर ध्वजाची स्थिती दुरुस्त करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमातच तिरंग्याबाबत असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
‘चूक झाली की निष्काळजीपणा?’ असा सवाल
राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानाशी संबंधित बाब असल्याने केवळ ध्वजाची स्थिती दुरुस्त करून प्रकरण संपवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. नेमकी चूक कशी झाली, त्यामागे निष्काळजीपणा होता का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या अर्जात संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर लागू कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय ध्वज फडकविताना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन या प्रकरणाची काय दखल घेते, याकडे कुर्डुससह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.