अलिबाग तालुक्यातील वळवली रा. आदिवासी वाडी, पो. मल्याण (ता. अलिबाग, जि. रायगड) येथे २६ वर्षीय विवाहित महिला अंकिता महेश नाईक हिचा मृतदेह जंगलातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता मृत महिलेचे पती महेश दत्ताराम नाईक हे मित्रांसह जंगलात गेले होते. त्यावेळी घरात पत्नी अंकिता व तिची बहीण उपस्थित होत्या. सायंकाळी सुमारे ४.०० वाजता पती घरी परतले असता पत्नी घरात आढळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र अंकिता मिळून आली नाही.
अखेर १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ६.०० वाजता पती, नातेवाईक व ग्रामस्थ जंगल व डोंगराळ भागात शोध घेत असताना अंकिता नाईक हिचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांच्या मदतीने तिला तात्काळ खाली उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्र, रेवदंडा येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद (अ.मृ. रजि. नं. ४४/२०२५) करण्यात आली असून, मृत्यूमागील कारणांचा पुढील तपास सुरू आहे.