रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात १२ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ही बाब उघड झाली. आरोपींमध्ये मुलीचा पती, तिचे वडील आणि सासरचे लोक यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मुलीचे वय कमी असूनही २०२३ साली तिचे लग्न लावण्यात आले. पतीने वयाची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं.१९९/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (POCSO) अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घुगे करीत आहेत. अल्पवयीन मुलींचे विवाह हे कायद्याने गुन्हा असल्याने पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.