पोलादपूर सरकारी कर्मचारी पतसंस्थेत 44 लाखांचा अपहार; माजी चेअरमनवर गुन्हा दाखल

पोलादपूर सरकारी कर्मचारी पतसंस्थेत 44 लाखांचा अपहार; माजी चेअरमनवर गुन्हा दाखल
पोलादपूर (शैलेश पालकर) :
पोलादपूर तालुक्यात नवनव्या पतसंस्था व नॉनबॅकिंग संस्थांची स्थापना होत असताना अनेक संस्था आर्थिक गैरव्यवहाराच्या गर्तेत बुडत आहेत. त्यातच आता पोलादपूर तालुका सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची भर पडली आहे. निवडणुकीतून निर्माण झालेल्या संचालक मंडळाऐवजी लेखापरिक्षकांकडून व्यक्तीविरोधी तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून यामुळे फक्त माजी चेअरमनविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी दिली.
माणगाव, महाड, पोलादपूर येथील शाखांमध्ये 1 जानेवारी 2003 ते 31 डिसेंबर 2006 दरम्यान बनावट ठेवी, कर्ज व व्याज दाखवून सुमारे 44 लाख 44 हजार 351 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. पेण येथील सहकारी संस्था लेखापरिक्षक श्याम प्रभाकर कपोते यांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, हा अपहार तत्कालीन चेअरमन अशोक ज्ञानू हजारे यांनी दबावतंत्र वापरून केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम 406, 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे करत आहेत.
पतसंस्थेच्या नियमांनुसार सर्व निर्णय संचालक मंडळाच्या संमतीने होत असतानाही फक्त माजी चेअरमन यांच्यावरच कारवाई झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशोक हजारे हे 2017 मध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते आणि त्यानंतरही पतसंस्था डबघाईला गेली. या प्रकरणात दोषींना सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकते, मात्र आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने आणि तपास सुरू असल्याने अद्याप अटक झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *