पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून, नितेश दळवी (वय ३५, रा. बारवई) या युवकाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलीस प्रशासनाला कळवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना करण्यात आला. सदर आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, नितेश दळवी हे स्वभावाने शांत होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ते काहीसे तणावात असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमकं कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.
या घटनेमुळे बारवई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नितेश यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून त्यांना मानसिक आधार देण्यासाठी परिसरातील नागरिक आणि नातेवाईक पुढे आले आहेत.